जळगाव : जळगाव ते औरंगाबाद या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार नसून आता कॉँक्रिटीकरणातून दुहेरी मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची घोषणा करून मंजुरीही दिल्याची घोषणा केली होती. जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून ये-जा करीत असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळेच रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजुरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे जळगाव दौ:यावर आले होते. या दौ:यात त्यांनी हजारो कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली होती. त्यात जळगाव ते औरंगाबाद या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचाही समावेश होता. घोषणा मंजुरी दिल्याप्रमाणे रस्त्याच्या कामाची निविदाही ई निविदा पद्धतीने प्रसिद्ध झाली मात्र ती चौपदरीकरण नव्हे तर दुहेरी मार्गाचे कॉँक्रिटीकरण करण्यासाठी असून त्यासाठी तीन ठप्पे निश्चित झाले. तीन टप्प्यातील ही निविदा असून संपूर्ण रस्त्याचे कॉँक्रिटीकरणातून काम केले जाणार आहे. सर्वसाधारणत: चौपदरीकरण असल्यास 15 मीटरचा रस्ता त्यात दुभाजक व दोन्ही बाजुने साडेसात-साडेसात मीटरचे दोन मार्ग अशी रचना असते. मात्र नियोजित रस्ता हा 10 मीटरचा असून त्यात दोन्ही बाजूने पाच-पाच मीटरचे दोन मार्ग असतील. रस्त्यात ठिकठिकाणी उड्डाणपूल, पूल, मो:या, शहरानजीकच्या रस्त्याच सिंगल दुभाजकही असेल. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या मार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता दुहेरी होत असल्याने मार्गावरील गावांमधील लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. भविष्यातील 20 ते 25 वर्षाचा विचार करून या रस्त्याची निर्मिती केली जात असल्यामुळे वाढत्या रहदारीचा विचार करून चौपदरीणकरण आवश्यक होते अशाच प्रतिक्रिया उमटत आहेत. टोल नसलेला रस्ता़़़ हे संपूर्ण काम बांधा, वापरा व कर वसूल करा या तत्त्वावरचा नसून इ.पी.सी. (इंजिनिअर प्रोक्युअरमेंट कंस्ट्रक्शन) या तत्त्वावर बांधण्यात येत आहे. त्या संदर्भातील निविदाही त्याच पद्धतीची असून निविदा प्रक्रियेचा कालावधी 3 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2017 असा आहे.अंतर कायम, अडथळे जास्तचौपदरीकरणामुळे जळगाव औरंगाबाद हे अंतर अवघ्या तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार होते कारण दुभाजक व कॉँक्रिटचा रस्ता हे शक्य होणार होते तर जळगाव- अजिंठा रस्ता चौपदरीकरणामुळे अर्धा ते पाऊण तासात पार करणे शक्य होणार होते मात्र आता या केवळ शक्यताच रहाणार आहेत.
जळगाव-औरंगाबाद चौपदरीकरण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 12:46 AM