जिल्ह्याचा केळीला मिळाली नवी ओळख : केळी उत्पादक शेतकऱ्यांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील केळी आपल्या आगळ्यावेगळ्या चवीमुळे संपूर्ण जगात ओळखली जाते. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील केळीला वाणिज्य मंत्रालयाने जीआय मानांकन दिल्यानंतर, आता भविष्यात जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना आपली केळी जीआय मानांकनाच्या टॅगने विदेशात निर्यात करता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील केळीला जगात चांगली बाजारपेठ मिळून, केळी उत्पादक शेतकऱ्यांचा केळीला चांगला भाव देखील भविष्यात मिळू शकणार आहे. रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथून जीआय मानांकनाच्या टॅगने प्रथमच दुबई येथे केळीची निर्यात झाली आहे.
नगदी फळपिकांची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवून निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने 'फलोत्पादन क्षेत्र विकास' म्हणजेच हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम ही योजना नव्याने हाती घेतली आहे. या योजनेत केळी पिकासाठी जळगाव जिल्ह्याचा समावेश करण्यात न आल्याने जिल्ह्यातील शेतकरी नाराज आहेत. मात्र, दुसरीकडे आता जिल्ह्यातील केळीला जीआय मानांकन मिळून, या टॅगने ही केळी विदेशात निर्यात करता येणार असल्याने जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
तांदळवाडीच्या केळीची ओळख आता जगाला कळणार
रावेर तालुक्यातील तांदळवाडी येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी गट तयार करून, केळीला नवीन ओळख मिळवून दिली आहे. तांदळवाडी येथील निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र व महाजन बनाना एक्स्पोर्ट या गटांनी जीआय मानांकनासाठी प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाल्यानंतर जीआय मानांकनासह अपेडाच्या माध्यमातून ( ॲग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रॉडक्ट डेव्हलमेंट ऑथोरिटी) जळगावची केळी विदेशात जीआय मानांकनासह निर्यात करता येणार आहे. भविष्यात ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली असेल त्या शेतकऱ्यांनाही जीआय मानांकनाचा लेबल लावून आपली केळी विक्री करता येणार आहे. यामुळे तांदळवाडीच्या केळीसह जिल्ह्यातील केळीला जगात नवी ओळख मिळणार आहे.
जळगावच्या केळीची वैशिष्ट्ये
जीआय मानांकनासाठी प्रस्ताव पाठविताना जिल्ह्यातील केळी देशातील इतर भागांत लागवड होणाऱ्या केळीपेक्षा विशेष कशी याबाबतची माहिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून देण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील केळी देशात आढळणाऱ्या कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात लागवड होणाऱ्या केळीपेक्षा अधिक गोड असते. यासह जिल्ह्यातील केळीमध्ये अधिक प्रमाणात फायबर व खनिजांचे प्रमाण आहे. जीआय मानांकनाच्या टॅगने केळी आता निर्यात होणार असल्याने जिल्ह्यातील केळीला इतरांच्या तुलनेत चांगला भाव मिळू शकतो.
कोट...
जिल्ह्यातील केळीची वैशिष्ट्ये अबाधित असून, आता जीआय मानांकन मिळून त्या लेबलने आपल्याला केळी निर्यात करता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे. तसेच भविष्यात केळी लागवडीला देखील चांगला वाव मिळणार आहे.
-शशांक पाटील, निसर्गराजा कृषिविज्ञान केंद्र