जळगाव,दि.9- इंदिरा आवास, पंतप्रधान आवास, शबरी व रमाई घरकूल योजनांबाबत मागील 2 तारखेला तहकूब बैठक 9 रोजी घेण्याचे स्वत: गटविकास अधिकारी (बीडीओ) यांनी निश्चित केले आणि 9 रोजी म्हणजेच मंगळवारी आयोजित बैठकीत स्वत: गटविकास अधिकारीच गैरहजर राहील्या. म्हणून त्यांची सीईओ यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय पं.स.सभापती व सदस्यांनी घेतला आहे.
दुपारी 2 वाजता पं.स.च्या सभागृहात घरकुलांबाबत स्वतंत्र बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सभापती यमुना रोटे, सदस्य नंदलाल पाटील, अॅड.हर्षल चौधरी, जागृती चौधरी, निर्मला कोळी यांच्यासह घरकुलांच्या लाभापासून किंवा निधीपासून वंचित असलेले 50 लाभार्थी व 32 ग्रामसेवक उपस्थित होते. परंतु गटविकास अधिकारी एस.पी.सोनवणे व घरकुलांच्या फायली, टेबलवर कार्यरत लिपीकच अनुपस्थित होते. ज्यांच्याकडे या योजनेचे उत्तरदायीत्व, अधिकार आहेत तेच अनुपस्थित राहील्याने लाभार्थीसह सदस्यांनी संताप व्यक्त केला.