रावेर लोकसभा मतदारसंघात चार पैकी तीन पदे जाणार
जळगाव, दि.28- जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य, समाज कल्याण, बाल कल्याण व कृषी या सभापतीपदांसाठी येत्या 1 एप्रिल रोजी जि.प.च्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात निवड होणार आहे. या पदांसाठी भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असून, रावेर लोकसभा मतदारसंघात चार सभापतीपदे दिली जाण्याची शक्यता आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे 22 जि.प.सदस्य निवडून आले आहेत. उपाध्यक्षपद रावेर लोकसभा मतदारसंघात असून, अध्यक्षपद जळगाव लोकसभा मतदारसंघात दिले आहे.
अशी असेल प्रक्रिया
सकाळी 11 ते दुपारी 1 र्पयत विविध समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल करता येतील. दुपारी 3 वाजता जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभापतीनिवडीसाठी विशेष सभा होईल. 3 वाजेनंतर 15 मिनिटे माघारीसाठी वेळ दिली जाईल. छत्रपती शाहू महाराज सभागृहात ही सर्व प्रक्रिया पार पडेल.
इच्छुक अनेक, पदे फक्त चार
सभापतीपदासाठी भाजपाचे अनेकजण इच्छुक असून, नेत्यांसमोरही कुणाची निवड करावी, असा प्रश्न आहे. यातच महाजन व खडसे गटात याबाबतची अधिकची चढाओढ सुरू आहे. इच्छुकांमध्ये आमदार संजय सावकारे यांच्या वहिनी पल्लवी सावकारे (कु:हा वराडसीम), पोपट भोळे (वाघळी पातोंडा), रंजना जे.चव्हाण (फत्तेपूर तोंडापूर), अमित देशमुख (पहूर वाकोद), रवींद्र सूर्यभान पाटील (दहिगाव साकळी), लालचंद पाटील (नशिराबाद भादली), ज्योती राकेश पाटील (वर्डी गोरगावले) आदींचा समावेश आहे. या सदस्यांचे कुटुंबीय व इतरांकडून नेत्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.