जळगाव,दि.9- जैन धर्मीयांचे 24 वे र्तीथकर शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामी यांच्या 2616 व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन श्री संघाच्यावतीने 9 रोजी सकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने सर्वाच्या डोळ्य़ांचे पारणे फेडले. काँग्रेसभवन समोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरापासून भव्यशोभायात्रेस प्रारंभ झाला. ‘त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की’ अशा जयघोषने शहर दुमदुमले.
शोभायात्रेने पाणी बचाव, बेटी बचाव आणि संस्कृतीचे दर्शन घडविले. जैनम् जयती शासनम् जैन धर्म की शान है..अशा भक्तीगीतांनीही लक्ष वेधून घेतले. महावीर जयंती निमित्त झालेल्या रक्तदान शिबिरासही भरघोस प्रतिसाद लाभला.
भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवांतर्गत रविवारी सकाळी काँग्रेस भवनासमोरील श्री वासुपूज्य जैन मंदिरात ध्वज वंदन करण्यात आले. त्यानंतर आठ वाजता महावीर स्वामींच्या सवाद्य मिरवणुकीस मंदिरापासून सुरुवात झाली.
सजविलेली बग्गी व चंदेरी रथातून महावीर स्वामींची प्रतिमा ठेवून अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीत भगवंतांचा जयजयकार करीत महिला-पुरुषांनी भक्तीगीत सादर केले. नेत्रदीपक वरघोडा मिरवणूक तसेच पंचरंगी ध्वज सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.
पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेले पुरुष आणि लाल, पिवळ्य़ा साडय़ा घातलेल्या महिला या मिरवणुकीत हजारोच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. समाजबांधवांनी एकमेकांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देत एकतेचे दर्शन घडविले. महोत्सवात माजी मंत्री सुरेशदादा जैन,माजी खासदार ईश्वरलाल जैन, शाकाहार प्रणेते रतनलाल बाफना, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, संघपती दलूभाऊ जैन, प्रमुख वक्ता डॉ.बिपीन दोशी, सुगनचंद राका,मनोज सुराणा, राजेश जैन यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.