जळगाव - राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘शिवभोजन’ योजनेची २६ जानेवारीपासून अंमलबजावणी होणार असून त्यासाठी जळगाव शहरातील वर्दळीची आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी केंद्र सुरू करण्यासाठी नऊ जणांनी अर्ज केले असून त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी दहा रूपयात ‘शिवभोजन’ योजनेची घोषणा केली होती. सत्तास्थापनेनंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शनिवार, ४ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे होते. या वेळी मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी उपस्थित होते. बैठकीत ‘शिवभोजन’ केंद्राच्या ठिकाणांबाबत चर्चा करण्यात आली. यात शासन निर्णयानुसार वर्दळीच्या ठिकाणी हे केंद्र असावे असे सुचीत करण्यात आले. त्यामुळे या केंद्रांसाठी शहरातील वर्दळीची आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे.या ठिकाणी असणार शिवभोजन केंद्रजिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅण्टीन, नवीन बस स्थानक परिसर, शासकीय रुग्णालय, रेल्वे स्थानक परिसर, गोलाणी मार्केट परिसर, तहसील कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय परिसर, शनिपेठ-बळीरामपेठ-रथचौक- भाजीबाजार परिसर, कृषी उत्पन्न बाजार समिती अशी आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणच्या केंद्रांसाठी नऊ जणांनी जिल्हास्तरीय समितीकडे अर्ज केले आहे. प्रत्येक केंद्रांसाठी किमान ७५ थाळी अशी एकूण ७०० थाळी जळगावसाठी मंजूर आहे. नऊ जणांच्या अर्जांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
जळगाव शहरात ‘शिवभोजन’साठी आठ केंद्र निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 11:57 AM