आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१५ :बक-या चोरीच्या संशयावरुन शनी पेठेत शनिवारी दुपारी एक ३५ वर्षीय महिला व तिच्या दोन लहान मुलांना रहिवाशी महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या तिघं मायलेकांना मारहाण करीतच शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी ही महिला, तिचे मुले व चोरलेली बकरी ताब्यात घेतली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जब्बार खान अलीर खान (वय ६० रा.शनी पेठ, जळगाव) यांच्याकडे तीन बक-या व एक बोकड आहे. दररोज सकाळी आठ वाजता बकºया व बोकड चरण्यासाठी सोडतात व दुपारी दोन वाजता त्यांना घरी आणले जाते. शनिवारी एक बोकड व एक बकरी घरी न आल्याने जब्बार खान यांनी शनी पेठ, काट्याफाईल व परिसरात त्यांचा शोध घेतला मात्र मिळून आल्या नाहीत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द शनी पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोळीचे तुकडे टाकून लांबविली बकरी सूत्रांच्या मते पकडण्यात आलेली महिला पोळीचे तुकडे टाकून बकºयांना जवळ बोलावून घेऊन जाते. शनिवारी असाच प्रकार झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शनी पेठेतील महिलांनी या महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर काही जणांनी तिच्या दोन्ही लहान मुलांनाही मारहाण केली. मारतच या तिघांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. ही महिला तिचे खरे नाव सांगत नाही. कधी सुप्रीम कॉलनी, मलकापूर तर कधी सुरत येथील रहिवाशी असल्याचे सांगत आहे.
पोलिसांच्या तावडीतून नेले मुलाला
शनी पेठ व चौबे शाळेच्या मागील भागातून अनेक बकºया चोरी गेल्या आहेत. या बकºया या महिलेनेच लांबविल्याचा संशय असून ती सुप्रीम कॉलनीत राहत असल्याचा संशयावरुन काही जणांनी तिच्या एका दहा वर्षाच्या मुलाला पोलिसांच्या तावडीतून स्वत:च्या ताब्यात घेतले. त्यानंतर एका रिक्षातून त्याला सुप्रीम कॉलनीत घेऊन गेले. सायंकाळी उशिरापर्यंत हा मुलगा परत आलेला नव्हता. आधीच या मुलांना बेदम मारहाण झाली. या संतापात आणखी काही प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण? पोलिसांनी या मुलाला लोकांच्या ताब्यात दिलेच कसे असे प्रश्न तेथे उपस्थित लोकांनी केले.