जळगाव : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रवेश देण्यात येणाऱ्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत जळगावच्याही वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला असल्याने या महाविद्यालयासाठी देखील प्रवेश अर्ज भरले जात आहे. त्यामुळे आता १ ऑगस्टपासून जळगावात वैद्यकीय अभ्यासक्रमास सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अर्ज दाखल करण्याचा १६ जून शेवटचा दिवस असून प्रवेशासाठी २ जुलै रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात हजर व्हावे (रिपोर्ट करणे) लागणार असल्याचे सांगण्यात आले.जळगाव येथे वैद्यकीय संकूल (मेडीकल हब) उभारणीसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी मान्यता दिली. त्यानुसार जळगाव-औरंगाबाद मार्गावर जळगावपासून ५ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे हे संकुल उभारले जाणार आहे. या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथी, भौतिकोपचारशास्र आणि दंत्त महाविद्यालय उभारण्यात येईल. या संकुलामध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल. तसेच १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय या मेडिकल हबमध्ये असेल.तूर्त हे महाविद्यालयास जिल्हा रुग्णालयापासून सुरू होणार आहे. त्यानुसार येथे आवश्यक त्या सुधारणा करण्यासह त्रूटीही दूर करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) मान्यता दिल्याने जळगाव येथे १०० जागांसाठी अभ्यासक्रम सुरू होऊ शकणार आहे.आता इयत्ता बारावी व ‘नीट’ परीक्षेचाही निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सर्वत्र वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. केंद्रीय प्रवेश पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया होत असून आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज मागविले जात आहे.यामध्ये विद्यार्थी आपल्या हव्या असलेल्या महाविद्यालयाचा प्राधान्यक्रम देत असून या यादीत जळगावच्याही वैद्यकीय महाविद्यालयाचाही समावेश असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.बी.एस. खैरे यांनी दिली.
जुलैपासून प्रवेशास सुरुवातजून महिन्यात अर्ज भरणे व त्यानंतर महाविद्यालयातनिहाय यादी तयार करणे अशी प्रक्रिया होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचे नाव जेथे आहे तेथे त्यास २ जुलै रोजी हजर व्हावे लागणार असून त्यानुसार जळगावात प्रवेश घेणारे विद्यार्थी या दिवशी येथे हजर होतील, असेही सांगण्यात आले. जुलै महिन्यात प्रवेश प्रक्रिया होणार असून १ आॅगस्टपासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमास सुरुवात होणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयाचाही यात समावेश आहे. त्यामुळे जुलै महिन्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन १ आॅगस्टपासून वैद्यकीय अभ्यासक्रमास येथे सुरुवात होईल.- डॉ. बी.एस. खैरे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव.