आॅनलाईन लोकमत,
जळगाव,दि.६-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातंर्गत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषदेच्या सचिव पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत विद्यार्थी संघटनांना दुर सारुन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. ३ महाविद्यालयांमध्ये युवासेनेने तर एका महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विजयमिळविल्याचा दावा केला आहे. तर उर्वरीत महाविद्यालयांमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाल्याने विद्यार्थी संघटनांना जोरदार धक्का बसला आहे.
यंदा नवीन विद्यापीठ कायद्यामुळे खुल्या विद्यार्थी निवडणुका होतील अशी अपेक्षा असताना, शैक्षणिक वर्ष संपत आल्यावर देखील शासनाला खुल्या निवडणुकांचे परिनियम तयार करता आले नाही. त्यामुळे शुक्रवारी जुन्याच कायद्याप्रमाणे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका उमवि अंतर्गत येणाºया सर्व महाविद्यालयांमध्ये घेण्यात आल्या. शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये या निवडणुका शांततेत पार पडल्या. चार महाविद्यालयांमध्ये झाली निवडणूक शहरातील एस.एस.बी.टी. अभियांत्रिकी महाविद्यालय, उमवि विभाग, मू.जे.महाविद्यालय व डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या सचिवपदाची निवड ही मतदानाने करण्यात आली. तर रायसोनी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट कॉलेज, नूूतन मराठा महाविद्यालय, बाहेती महाविद्यालय, शिरीष चौधरी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी, आय.एम.कॉलेज व मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेच्या सचिवांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अभाविपला बसला धक्का महाविद्यालयांमध्ये झालेल्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला मोठा धक्का बसला असून, शहरातील केवळ मू.जे.महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उमेदवार विजयी झाला आहे. तर उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व बाहेती महाविद्यालयात युवासेनेने बाजी मारली असल्याचा दावा युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश ठाकुर यांनी केला आहे. तर राष्टÑीय युवक कॉँग्रेससह युवक राष्टÑवादी संघटनेला एकाही महाविद्यालयात बाजी मारता आली नसल्याचे या निवडणुकीत दिसून आले.
८ तारखेपर्यंत पाठवावी सचिवांची यादी महाविद्यालयांमध्ये झालेल्या निवडणुकानंतर विजयी झालेल्या विद्यार्थी परिषदेच्या सचिवांची नावे सर्व महाविद्यालयांना सोमवारपर्यंत विद्यापीठाकडे पाठवावी लागणार आहेत. त्यानंतर १५ ते २० विद्यार्थ्यांची नावे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी नियुक्त करणार आहेत. त्यानंतर १२ जानेवारीपर्यंत विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
अपक्षांना वळविण्यासाठी धडपड अपक्ष उमेदवारांनी मिळविलेल्या विजयानंतर त्यांनी आपल्या संघटनेला पाठींबा द्यावा यासाठी विद्यार्थी संघटनांमध्ये चढाओढ दिसून आली. निवडणुकानंतर विजयी झालेल्या विध्यार्थ्याची भेट घेवून, त्यांचा सत्कार विद्यार्थी संघटनांच्यावतीने करण्यात आला. मात्र अनेक महाविद्यालयांमधील अपक्ष निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघटनांची ‘आॅफर’ स्पष्टपणे नकार दिल्याचे चित्र दिसून आले.
समाजकार्य महाविद्यालयात निवडणूक परत घ्या शहरातील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात सुवर्णा दळवी हिच्या विरोधात उमेश राठोड या विद्यार्थ्याने केलेला उमेदवारी अर्ज छाननीनंतर बाद झाल्याने सुवर्णा दळवीची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर उमेश राठोड याने ही निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे सांगून उमविचे कुलसचिव बी.बी.पाटील यांच्याकडे निवडणूक नवीन घेण्याची मागणी केली आहे. १२ पैकी ७ वर्ग प्रतिनिधी आपल्याच बाजुने असल्याचा दावा देखील उमेश राठोड याने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.