- सागर दुबेजळगाव : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सोमवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. ४८ अधिका-यांसह १८३ कर्मचा-यांनी रस्त्यावर उतरून ७०० ते ८०० वाहनांची तपासणी तर केलीच हद्दपार आरोपींसह हिस्ट्रीशिटरांना सुध्दा पकडले.पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मागदर्शनाखाली पोलिसांकडून जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटाच लावला आहे. अनेकांवर हद्दपार, मकोका आणि एनपीडीए कायद्यातंर्गत कारवाई करण्यात आली आहे. आणखी काही गुन्हेगार या कारवाईंच्या रडारवर आहेत. त्यातच जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी आणि गुन्हेगारीला आळा बसावा या उद्देशाने जिल्हा पोलिस दलाकडून सोमवारी मध्यरात्री अचानक कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील ३४ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. ४८ अधिकारी व १८३ पोलिस कर्मचा-यांनी रस्त्यावरून उतरून ७०० ते ८०० वाहनांची तपासणी केली. त्यात नियम मोडणा-या १४२ वाहनांवर कारवाई करून त्यांना ५८ हजार ६०० रूपयांचा दंड करण्यात आला आहे.१०३ हॉटेल तपासले...कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी जिल्ह्यातील १०३ हॉटेल, लॉजेस आणि गेस्ट हाऊस तपासले. याची पोलिस दप्तरी नोंदही घेण्यात आली. त्याशिवाय ज्या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार राहतात, त्याठिकाणी अचानक भेट देवून पोलिसांनी १५५ गुन्हेगार तपासले. त्यानंतर त्यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या.
३१ जणांना वॉरंट बजावणी...जिल्ह्यात २३ जणांना नॉनबेलेबल तर ०८ जणांना बेलेबल असे एकूण ३१ जणांना मध्यरात्री वॉरंटची बजावणी पोलिसांकडून झाली. तर ड्रंक ॲण्ड ड्राईव्ही दोन वाहनधारकांवर कारवाई करून त्यांना दंड ठोठावण्यात आला. तर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणा-यावर कारवाई करण्यात आली. तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हद्दपार आरोपी पोलिसांना मिळून आला तर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ०२ हिस्ट्रीशिटर मिळून आले आहे. तर एक दारूबंदीची कारवाई करण्यात आली. तसेच बीपी ॲक्टनुसार रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार दोन आरोपींवर कारवाई झाली.