राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजपाचे नेते नीलेश राणे यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी जळगावातील नशिराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी कव्वाली गायन केलं होतं. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत त्यांना लक्ष्य केलं होतं. दरम्यान, यानंतर शिवसैनिक त्यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू बाबुराव भोई यांनी मुक्ताईनगर पोलिसात निलेश राणे यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. माजी खासदार निलेश राणे यांनी मंत्री पाटील यांच्याविरुद्ध ट्विटर हँडलवर बदनामीकारक पोस्ट टाकली आहे. तसेच शिवीगाळही केलेली आहे, अशी फिर्याद त्यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक राहुल खताळ करत आहेत.