जळगाव : कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या जळगाव येथील रुग्णाचा गुरुवारी मृत्यू झाला असून यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा हा पहिला बळी असून या रुग्णाचा अहवाल आल्यानंतर २४ तासाच्या आत त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, जळगावात या पूर्वीही शनिवार, २८ मार्च रोजीदेखील एक कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला आहे.गेल्या दोन आठवड्यांपासून जळगावात कोरोना संशयित म्हणून रुग्ण दाखल होत आहे. यात शनिवार, २८ मार्च रोजी एका रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यानंतर पाचच दिवसात बुधवारी आणखी एक रुग्ण आढळून आला. शहरातील सालार नगर भागातील रहिवासी असलेल्या या रुग्णाचा बुधवारी संध्याकाळी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.या रुग्णाला मधुमेह, ह्रदयविकार, अस्थमा, उच्च रक्तदाब असे अनेक विकार होते. त्यामुळे त्याच्या विविध तपासण्यादेखील करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर मृत्यू झाला असला तरी हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अहवाल शुक्रवारी येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी जिल्ह्यात यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.कोरोनाचे दोन रुग्ण आढळले तरी बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली नसून सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
जळगावात कोरोनाचा पहिला बळी, अहवालानंतर २४ तासाच्या आत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 6:00 PM