जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमधील २५ टक्के जागांवर मुलांच्या प्रवेश निश्चितीसाठी दि. ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुलांचे मोठ्या संख्येने प्रवेश बाकी असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. ३०८१ जागा उपलब्ध असून, त्यासाठी ११२९० अर्ज आले होते. त्यातून २९८३ अर्जांची निवड राज्यस्तरावर सोडत काढून करण्यात आली होती. या मुलांना शाळांमध्ये प्रवेश निश्चितीसाठी दि. २५ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याची ऑनलाइन प्रक्रिया दि. १३ पासून सुरू झाली मात्र पहिल्या दिवसापासूनच पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.
पोर्टल स्लो असल्याने प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडथळे येत होते. त्यामुळे मुदत संपण्यास एक दिवस बाकी असताना जळगाव जिल्ह्यात केवळ ४४७ मुलांचे प्रवेश निश्चित होऊ शकले आहेत. राज्य स्तरावर १,०१,८४६ जागांसाठी ९४,७०० अर्जांची निवड झाली होती. त्यापैकी केवळ १२,३३२ प्रवेश होऊ शकले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने दि. ८ मे २०२३ पर्यंत प्रवेशाची मुदत वाढवून दिली आहे. त्या चुकीचा पालकांना फटकादरम्यान, अर्ज भरताना शाळांचा प्राधान्यक्रम चुकणे किंवा नको असलेल्या शाळेच्या नावाचा समावेश केल्याचा फटका प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर पालकांना बसत आहे. त्यामुळे शाळा बदल करून मिळणेसाठी प्राथमिक शिक्षण विभागात पालक संपर्क साधत आहेत. परंतु, संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने पालकांना नकार मिळत आहे.