जळगावातील प्रस्तावित माता व बालसंगोपन हॉस्पिटलचं भूमिपूजन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून या रुग्णालयाचं काम होणार आहे. परंतु भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेतून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे यांचीच नावे गायब झाल्यानं हा वाद निर्माण झाला आहे. हा वाद एवढ्यावर थांबला नसून भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी याच विषयावरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पालकमंत्र्यांनी श्रेयवादासाठी आरोग्य यंत्रणेवर दबाव आणला, शासकीय प्रोटोकॉलचं पालन न करत घाईघाईने भूमिपूजन उरकलं असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
दरम्यान, एकीकडे गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयाच्या भूमिपूजनासाठी नारळ फोडला असला तरी दुसरीकडे मात्र वादालाही तोंड फुटलं. खासदार उन्मेष पाटलांनी संताप व्यक्त करत रुग्णालयासाठी कसा पाठपुरावा केला, त्याची माहिती देत सगळा इतिहासचं काढला. पालकमंत्र्यांचा टक्केवारीसाठी खटाटोप सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
याशिवाय भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका रात्रीतून बदलण्यात आल्याचाही आरोप उन्मेष पाटील यांनी केला. या प्रकरणी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा दिला आहे. “लोकांना घेऊन योजना राबवली पाहिजे. पालकमंत्री ठेकेदारांना घेऊन योजना राबवत आहेत, त्यामुळे हक्कभंग लावून अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी ३० कोटी रूपये नॅशनल हेल्थ मिशनमधून दिले आहेत. याचा आराखडा सात आठ वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हा यांना जाग नव्हती. जेव्हा मी खासदार होतो तेव्हा जागा मिळवली. परत तो प्रस्ताव पाठवला. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीही बैठका घेतला. हे सर्व पालकमंत्र्यांना माहित नाही. निविदा झाल्यावर माझं काय मी नारळ फोडतो, आम्ही स हेर्व लोकांसमोरही आणू,” असं पाटील म्हणाले. आता पुढं नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.