यावल (जळगाव) - साकळी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामसभा सुरू असताना उपस्थित नागरिकांपैकी एकाने माझ्याकडे का पाहतो? अशी विचारणा केली, यावरुन दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. याचे रूपांतर नंतर लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीत झाले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन्ही गटाचा मोठा जमाव जमला. जमावाने कार्यालयासह एकमेकांवर दगडफेक केल्याने एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर एका चारचाकी वाहनाच्या काचाही फोडल्या. घटनेची माहिती पोलीस निरीक्षक डी परदेशी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि जमावाला पांगवले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्ताने तालुक्यातील साखळी येथील ग्रामपंचायतीच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात ग्रामसभा सुरू होती. ग्रामसेवक डी आर निकुंभ सभेचे विषय वाचत असताना अचानक दोन गटातील दोघांमध्ये तुंबळ हाणामारी सुरुवात झाली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करत ग्रामपंचायत कार्यालयावरही दगडफेक केली आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या समोर सुमारे 1000 नागरिकांचा जमाव जमला होता. जमावाने महानगरातील सुभाष चौधरी यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या. गावात तणावाची स्थिती असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.