तीन कोटींनी वाढ : समाज कल्याण विभागाचा दीड कोटींचा अनशेष अदा
जळगाव : जिल्हा परिषदेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प जि.प.प्रशासनाने मंजूर केला आहे. यंदाचा अर्थसंकल्प 26 कोटी रुपयांचा असून, त्यात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तीन कोटींनी वाढ झाली आहे.
मागील अर्थसंकल्प 23 कोटींचा होता. त्यात समाज कल्याण विभागाचा दीड कोटींचा अनुशेष भरून काढता आला नव्हता.
पण हा अनुशेष भरणे आवश्यक असल्याने यंदा दीड कोटी रुपये समाज कल्याण विभागासाठी अदा करण्यात आले आहेत.
प्रशासनाला होते अधिकार
जि.प.अर्थसंकल्प मंजुरीचे अधिकार अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना असतात, पण यंदा जि.प.ची निवडणूक, आचारसंहिता यामुळे हा अर्थसंकल्प प्रशासनाने मंजूर केला. 21 मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर करायचा असतो, पण त्यास यंदा काहीसा विलंब झाला आहे. मध्यंतरी वित्त विभागातील कर्मचा:यांचे आंदोलन सुरू होते, त्यामुळे कामकाजावर परिणाम झाला आणि अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूप देण्यास विलंब झाल्याचे स्पष्टीकरण जि.प.प्रशासनाने दिले आहे.
अपंग कल्याण योजनांसाठी तीन टक्के
अर्थसंकल्पातील तीन टक्के रक्कम ही अपंग कल्याण योजनांसाठी राखीव केली आहे. तर समाज कल्याण विभागासाठी 20 टक्के, महिला व बाल कल्याण विभागासाठी 10 टक्के, पाणीपुरवठा विभागासाठी 20 टक्के रकमेची तरतूद केली आहे.
कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, लघुसिंचन, आरोग्य या विभागांसाठीही अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली आहे.
विद्यानिकेतनमधील कर्मचा:यांचे वेतनही स्वनिधीतून
जि.प.च्या स्व:उत्पन्नातून म्हणजेच अर्थसंकल्पातच जि.प.तर्फे चालविण्यात येणा:या विद्यानिकेतन विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी यांच्या वेतनासाठी तरतूद केली आहे. जवळपास दोन कोटी रुपयांवर रक्कम वेतनासाठी राखून ठेवण्यात आली आहे.
जि.प.चा अर्थसंकल्प 26 कोटींचा असून, त्यास मंजुरी देण्यात आली आहे. अर्थसंकल्पामधील तरतुदींबाबतचे अधिकार यंदा प्रशासनाला होते. जि.प.च्या सर्वसाधारण सभेत हा अर्थसंकल्प केवळ अवलोकनार्थ सदस्यांसमोर सादर केला जाईल.
-नरेंद्र महाजन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.