जळगाव : जिल्ह्यात गावोगावी जिल्हा बँकेच्या शाखा नसताना व एटीएमची सुविधा नसताना पिक कर्ज मिळाले तरी रक्कम काढता येत नसल्याचा कटू अनुभव असल्याने यंदातरी एटीएमची सक्ती करून बळीराजास वेठीस धरु नका, अशी आर्त हाक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिली आहे. यासाठी वि.का. सोसायटीचे चेअरमनदेखील पुढे सरसावले असून पिक कर्ज थेट सभासदांच्या बचत खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.दरवर्षी नवीन आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू होते. दोन वर्षांपासून ही रक्कम मिळविण्याकरिता जिल्हा बँकेमार्फत केसीसी योजनेंतर्गत एटीएमची सक्ती करण्यात आली आहे. यात शेतकरी सभासदांना बँकेमार्फत एटीएम कार्ड देण्यात आले. सुरुवातीला तर बँकेमार्फत देण्यात आलेले हे कार्ड अनेक ठिकाणी चाललेच नाही. बँकेमार्फत तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र सभासदांना पिक कर्ज मंजूर झाले तरी त्याला ते काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.एटीएमची सुविधा नाहीजिल्ह्यातील स्थिती पाहिली तर गावोगावी एटीएमच तर काय जिल्हा बँकेच्या शाखादेखील नाही. त्यामुळे शेतकरी किती वेठीस धरला जात आहे, हे या वरुन लक्षात येते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या शाखा आहे, तेथे जाण्यासाठीच शेतकरी कसाबसा पोहचतो. त्यात आता तर एटीएमसाठी कसरत करण्याचीच वेळ शेतकºयांवर आली आहे.रक्कम जमा होताच झुंबडजिल्हाभरात जिल्हा बँकेचे कोठेच एटीएम नाही. ज्या गावांमध्ये इतर बँकांचे एटीएम आहे, तेथे सर्वच शेतकºयांना रक्कम मिळेल याची शाश्वती नसते. पिक कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा होताच एटीएमवर शेतकºयांची झुंबड होते. त्यामुळे काही शेतकºयांना रक्कम मिळते तर काही शेतकरी रिकाम्या हातानेच घरी परतात.एटीएमसाठी नाहक भुर्दंड, ५० कि.मी.पर्यंत फिराफीरजिल्ह्यात जिल्हा बँकेच्या शाखा नसल्याने शेतकºयांना इतर बँकेच्या एटीएममधून रक्कम काढावी लागते. त्यात पहिले तीन व्यवहार मोफत होतात, मात्र त्यानंतर एका व्यवहारासाठी २५ रुपये भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. विशेष म्हणजे एका व्यवहारात पुरेसी रक्कम काढताच येत नाही, त्यामुळे एका पेक्षा जास्त वेळा रक्कम काढण्याची वेळ शेतकºयांवर येते व मोठा भूर्दंड शेतकºयांना सहन करावा लागतो. या सोबतच गावात रक्कम मिळत नसल्याने ग्रामीण भागातील शेतकºयांस ५० कि.मी.पर्यंत जावून रक्कम काढावी लागते.दुष्काळी स्थितीत भरणा केला, यंदा फिराफीर नकोगेल्या वर्षी कमी पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात असून दुष्काळी परिस्थितीवर मात कर्जाची परफेड केली आहे, त्यामुळे यंदातरी एटीएमची सक्ती न करता फिराफीर करायला लावू नका, असे कळकळीची मागणी शेतकरी करीत आहे.वि.का.सो. चेअरमनकडून निवेदनया संदर्भात शुक्रवारी यावल तालुक्यातील वि.का.सोसायटींचे चेअरमन यांनी जिल्हा बँकेसह जिल्हा प्रशासन, जिल्हा उप निबंधकांना निवेदन देऊन सभासदांना २०१९-२० या वर्षाचे पिक कर्ज राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे सभासदांच्या बचत खात्यात जमा करावे, अशी मागणी केली.या वेळी यावल तालुक्यातील सांगवी बु. विकासो चेअरमन प्रशांत चौधरी, कैलास महाजन (चिखली बु.), रवींद्र पाटील, (आडगाव), भरत पाटील (नायगाव) प्रमोद बोरोले (बामणोद), शशिकांत पाटील (उंटावद), संजय महाजन (बोरावल), मुर्फत अली सैय्यद (मारूळ), भगवान सूर्यवंशी (चिंचोली) कोळी, (कोळन्हावी), सुरेश पाटील ( चिखली खुर्द), अर्जुन वामन चौधरी, (मनवेल), पद्माकर भिरूड (डोंगर कठोरा), किनगावचे माजी चेअरमन विनोदकुमार पाटील आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यात एटीएम कार्डच्या सक्तीमुळे बळीराजा वेठीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:32 PM