आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२५: बोंडअळीमुळे कपाशी पिके उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आल्याने मोती संगडा पवार (वय ५०, रा.रामदेववाडी, ता.जळगाव) या शेतक-याने मध्यरात्री विष प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, मोती संगडा पवार यांच्याकडे ५ एकर हंगामी बागायती शेती आहे. या शेतात ज्वारी व कापसाची लागवड केली होती. ज्वारीचे फारसे उत्पन्न आले नाही, त्यामुळे कपाशी पिकावरच मदार होती. कपाशीचा हंगाम निम्मे झाला तरी त्यातूनही फारसे उत्पन्न आले नाही. हिवाळ्यामुळे उत्पन्न वाढण्याच्या आशा होत्या, मात्र पिकावर बोंडअळीचा प्रार्दभाव झाल्याने पवार कमालीचे खचले होते.
शुक्रवारी मध्यरात्री ते शेतात गेले. पिकांवर फवारणी करण्याचे औषध शेतातच असल्याने त्यांनी तेथेच हे औषध प्राशन केले. दरम्यान, पवार यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटीचे ६० हजार व खासगी असे लाखाच्यावर कर्ज होते. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे समाधान पाटील यांनी पंचनामा करुन मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व गावक-यांची मोठी गर्दी झाली होती. पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.