अजय पाटील, जळगाव : पावसाळा म्हटला की, साथरोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. यंदा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ झाली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात सुदैवाने कॉलराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातून कॉलरा हद्दपार झाला, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकुन गुनिया, कॉलरा हे साथरोग डोकं वर काढत असतात. त्यात अनेक रुग्णांचा मृत्यू देखील होत असतो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला काही साथरोगांवर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले आहे. त्यात कॉलराचा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातून कॉलरा हद्दपार झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये जि.प.आरोग्य विभागासोबतच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात सजगता वाढल्याने कॉलरा हद्दपार झाल्याचे चित्र आहे.
पारोळ्यात २०१८ मध्ये शेवटचा रुग्ण
कॉलरा या आजाराचा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. ऑगस्ट २०१८ मध्ये पारोळ्यात कॉलराचे ६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर २०१८ ते सप्टेंबर २०२३ पर्यंत जिल्ह्यात कॉलराच्या एकही रुग्णाची नोंद झालेली नाही.