जळगाव, दि. 7 - जिल्हा रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात गेल्या दोन आठवडय़ांपासून कायमस्वरुपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे. या कक्षातील डॉक्टर रजेवर असल्याने रुग्णांवर समाधानकारक उपचार होत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्याने येथे कायम रुग्णांची ओरड असते. संसर्गजन्य कक्षात डायरिया, क्षयरोग या आजारासह कुत्र्यांनी तसेच हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला केलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र या कक्षाचे डॉक्टर अगोदर प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यानंतर सध्या ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या जागी अतिदक्षता विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय बिराजदार प्रभारी म्हणून काम पाहत आहे. मात्र अतिदक्षता विभागात रुग्णांची संख्या वाढली की, या कक्षाकडे दुर्लक्ष होते. या कक्षात तत्काळ डॉक्टरांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. जिल्हा रुग्णालयात मंजूर पदांपैकी निम्मेही डॉक्टर नाही. 14 क्रमांकाच्या कक्षातील डॉक्टर सध्या रजेवर असल्याने तेथे अतिदक्षता विभागातील डॉक्टर काम पाहत आहे. मात्र अतिदक्षता विभागात ताण वाढला की, तिकडे पहावे लागते. एक-दोन दिवसात 14 क्रमांकाच्या कक्षाचे डॉक्टर हजर होतील. - डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.
जळगाव जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:31 PM
डॉक्टर रजेवर : संसर्गजन्य कक्षातील स्थिती ऑनलाईन लोकमत
ठळक मुद्दे कक्षाचे डॉक्टर अगोदर प्रशिक्षणासाठी सध्या डॉक्टर रजेवरकक्षाकडे दुर्लक्ष