जळगाव : सोयगाव तालुक्यातील पळासखेडा येथील शिलाबाई पद्मसिंग राजपूत (३३) या महिलेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचा रविवारी उपचार घेत असताना मृत्यू झाला़ दरम्यान, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचा नातेवाईकांनी आरोप करीत गोंधळ घातल्याचा प्रकार सोमवारी जिल्हा रुग्णालयात सकाळी घडला़ दरम्यान, यामुळे काहीवेळ तणाव सुध्दा निर्माण झाला होता़ तर कुटुंूंबीयांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.शिलाबाई राजपूत या शनिवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या होत्या़ त्यानंतर त्यांच्यावर महिला वैद्यकीय अधिकारीकडून कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली़ मात्र, रविवारी सकाळपासून महिलेची प्रकृती खालावली़ त्यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला डॉक्टरास संबंधितांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, तो झाला नाही़नंतर रात्री पुन्हा प्रकृती खालावल्यामुळे महिलेस अतिदक्षता विभागात हलविण्यात आले़ परंतु, सोमवारी सकाळी उपचार घेत असताना शिलाबाई यांचा मृत्यू झाला़ दरम्यान, महिलेची प्रकृती चिंताजनक असतांना शस्त्रक्रिया करणारी महिला डॉक्टरकडून दुर्लक्ष केले गेले़ त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. त्यानंतर काहीवेळ गोंधळ झाला होता़जनरल फिजीशियन येईनाजिल्हा रूग्णालयात नवीन डॉक्टर देखील काम करण्यास इच्छुक नसल्याचे बघायला मिळत आहे़ गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात जनरल फिजीशियन डॉक्टर उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जे डॉक्टर उपलब्ध आहे, ते वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांकडे बोट दाखवित आहे. त्यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे़
जळगाव जिल्हा रूग्णालयात शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:06 PM