ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 13- जिल्हा रुग्णालयातील निवासस्थाने खाली झाल्यानंतरही तसेच असलेले अतिक्रमण मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले. जवळपास 100 घरांचे हे अतिक्रमण काढल्याने हा परिसर मोकळा झाला असून ज्या घरांमध्ये अद्यापही रहिवास होता व साहित्य होते अशा 10 ते 12 घरांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यानंतर येथे मोठे बदल व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये आता येथील निवासस्थाने जीर्ण झाल्याने ते पाडून त्या ठिकाणी फ्लॅट सिस्टीमनुसार कमी जागेत जास्त निवासस्थाने उभारण्यात येणार असून उर्वरित जागेत शासकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल तसेच महिला व बाल रुग्णालय उभारण्यास प्राधान्य राहणार आहे. येथील निवासस्थानांचे 1939 साली बांधकाम करण्यात आले असून ते जीर्ण झाले आहेत. त्यामुळे ते पाडून नवीन निवासस्थाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात येथील रहिवाशांना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यानुसार येथील 84 निवासस्थाने रिकामी करण्यात आली. या ठिकाणी जवळपास 100 अतिक्रमण केलेली घरे होती. ती पाडण्याची प्रक्रिया हाती घेऊन मंगळवारी हे अतिक्रमण जेसीबीद्वारे पाडण्यात आले. यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास सूचना देऊन जेसीबी उपलब्ध करून दिले.
उर्वरित अतिक्रमणांना तीन दिवसांची मुदतयेथे 10 ते 12 अतिक्रमीत घरांमध्ये अद्यापही साहित्य असून ते खाली करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
मंगळवारी अतिक्रमण काढत असताना काही जणांनी विरोध केला. मात्र त्यांची समजूत काढण्यात आली व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती भागात महिला व बाल रुग्णालय असावे म्हणून निवासस्थानांची उभारणी झाल्यानंतर असे रुग्णालय तसेच वेअर हाऊस उभारण्याचाही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील अतिक्रमण मंगळवारी जमीनदोस्त केले असले तरी येथील अधिकृत निवासस्थाने पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. निवासस्थाने रिकामी झाली असली तरी ती पाडण्यासाठी सा.बां. विभागाची परवानगी आवश्यक आहे. परवानगी घेऊन ही निवासस्थाने पाडण्यात येतील व त्यानंतरही पुढील कामास सुरुवात होऊ शकले.