लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हाभरात कोरोना लसीकरणासाठी पहिल्या दिवशी सात केंद्रांवर प्रत्येकी १०० अशे ७०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट असताना पहिल्या दिवशी केवळ ४३२ आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लस घेतली. एकूण उद्दिष्टापैकी ६१ टक्के कर्मचाऱ्यांनीच पहिल्या दिवशी लस टोचून घेतली.
काही डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर लस घेतल्यानंतर नेमके परिणाम काय समोर येतात हे बघूनच लस घेऊ, अशी मानसिकता अनेक कर्मचाऱ्यांनी बाळगल्याने पहिल्या दिवशी कमी लसीकरण झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यास दिवशी अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी प्रारंभी लस घेतली.
जामनेर येथील केंद्रावर परिचारिका आशा तायडे यांना लस घेतल्यानंतर घशाला कोरड पडण्यासह खोकला आला. त्यांना तातडीने औषधोपचार करून अर्धा तासाने घरी पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.