जळगाव : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पावसाच्या टक्केवारीत आठवडाभरातच १४.२ टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पावसाची टक्केवारी ४७.४ टक्केवर पोहचून पन्नाशीकडे वाटचाल सुरू आहे. त्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणसाठ्यातही वाढ होऊन बळीराजाही सुखावला आहे.यंदाही उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने सध्या गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखविली आहे. त्यात शनिवार व रविवारच्या दमदार पावसाने नदी-नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जळगाव शहरातही पावसाच्या पाण्याने ठिकठिकाणी तळे साचले आहेत.आठवडाभरात टक्केवारीत मोठी वाढपावसाळ््याचे दोन महिने संपत आले तरी जुलै अखेरपर्यंत केवळ ३३.२ टक्केच पाऊस झाला. मात्र गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पावसाच्या टक्केवारीत आठवडाभरातच थेट १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २७ जुलै रोजी ३३.२ टक्केवर असलेली पावसाची टक्केवारी दररोज वाढत गेली. यामध्ये २८ जुलै रोजी एकाच दिवसात ५.३ टक्क्यांनी वाढ होऊन त्या दिवशी पावसाची टक्केवारी ३८.५ टक्केवर पोहचली. ३० रोजी पावसाच्या टक्केवारीने चाळीशी गाठली. त्यानंतरही ही वाढ सुरूच राहून ४ आॅगस्ट रोजी पावसाची टक्केवारी ४७.४ टक्केवर पोहचली आहे.
जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात १४ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:04 PM