जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे गंभीर रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना कोराेनात उपचारार्थ वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे. हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांची फिरफिर व चिंता अधिकच वाढली आहे. सोमवारी रेमडेसिविरचे ५३० इंजेक्शन प्राप्त झाले. मात्र, मागणीच्या हा दहा टक्के पुरवठा असल्याचे औषध निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव यांनी सांगितले.
साठा - ५३०
मागणी - ५ हजार, यंत्रणेनुसार मूळ गरज : २५००
शासकीय यंत्रणेत पुरेसा साठा शिल्लक असून केवळ खासगी कोविड रुग्णालयांना हे इंजेक्शन मिळत नाहीय. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शासकीय रुग्णालयांमध्ये अतिरिक्त साठा होता. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र तो नव्हता, अशा वेळी अचानक रुग्ण वाढल्याने खासगी यंत्रणेत हा तुटवडा निर्माण झाला. शासकीय यंत्रणेकडे मात्र तो साठा पुरेसा आहे. खासगी व शासकीय यंत्रणेला पुरवठा करणारे पुरवठादारही वेगवेगळे आहेत. यांच्या यंत्रणा वेगवेगळ्या आहेत.
रुग्णांचे नातेवाईक म्हणतात...
खासगी रुग्णालयात वडिलांना दाखल केले. सुरुवातीला रेमडेसिविर दिले जातील, असे रुग्णालयाने सांगितले. मात्र, तीन दिल्यानंतर उर्वरित तुम्हीच बाहेरून आणा, असे रुग्णालयाने सांगितले. आम्ही खूप फिरलो, मात्र इंजेक्शन मिळाले नाही. अखेर एक इंजेक्शन अधिकचे पैसे देऊन मिळवावे लागले. मात्र, दुसऱ्या दिवशी पुन्हा फिरफिर, असे एका रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले. वॉर रूमकडून व प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी मांडली.