जळगाव : जिल्ह्यात खरीप पणन हंगाम २०१९-२०मध्ये केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ज्वारी, बाजरी व मका या भरडधान्य खरेदीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बिगर आदिवासी क्षेत्रात १५ खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे.या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा आॅनलाईन सातबारा उतारा, आधार कार्डची झेरॉक्स व बँक पासबुक किंवा रद्द (कॅन्सल) चेकची झेरॉक्स सादर करावयाची आहे. शेतकरी नोंदणी १ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु झालेली असून नोंदणी व खरेदीची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे.२०१९-२०च्या खरीप पणन हंगामात हायब्रीड ज्वारी २५५० रुपये, मालदांडी ज्वारी २५७० रुपये, बाजरी २००० रुपये व मका १७६० रुपये असा हमीभाव शासनाने निश्चित केलेला असून सदरचा हमीभाव हा एफ.ए.क्यू दर्जाच्या धान्याकरिता आहे. यामध्ये न डागाळलेला, स्वच्छ प्रतिचा व १४ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेला माल खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जास्तीत जास्त शेतकºयांनी भरडधान्य खरेदीकरीता आॅनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी परिमल साळुंखे यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यात भरडधान्य १५ खरेदी केंद्र सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:55 PM