विकास पाटीलजळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जळगावचा विकास खुंटला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आहे. जळगावचा विकास करायचा असेल तर आमच्या हाती सत्ता द्या, वर्षभरात विकास करुन दाखवितो, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले अन् त्यास जळगावकरांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला दिसतो.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले आहे. १९८० साली भाजपाची स्थापना झाली. यानंतर १९८५ च्या जळगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला फक्त ४ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतरही भाजपाला पाहिजे तसे यश तत्कालीन नगरपालिकेत व त्यानंतर स्थापनझालेल्या मनपा निवडणुकीतही मिळाले नाही. २००३ मध्ये सर्वाधिक २७ जागांपर्यंत भाजपाने मजल मारली. एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपाचे डॉ.के.डी. पाटील विजयी झाले होते, एवढेच यश भाजपाला मिळाले होते.यावेळी मात्र भाजपाने सर्वच्या सर्व ७५ जागा स्वबळावर लढविल्या. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ऐवजी पहिल्यांदाच जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढण्यात आली. त्यांनी कुणावरही टीका, आरोप न करता शांत व संयमीपणे प्रचार केला. जळगावकरांनी फक्त वर्षभर भाजपाला संधी द्यावी. जळगावचा रखडलेला विकास करुन दाखविणार. त्यासाठी राज्य शासनाकडून २०० कोटी आणणार. ज्या प्रमाणे जामनेरचा विकास केला, तसाच जळगावचा विकास करणार. मुख्यमंत्र्यांनी मला २०० कोटींच्या निधीचे आश्वासन दिले आहे, असा प्रचार केला. वर्षभरात विकास केला नाही तर आगामी विधानसभेत आपल्याकडे मते मागायला येणार नाही....असे जळगावकरांना आवाहन केले. त्या आवाहनाला जळगावकरांना मतदानाद्वारे दाद दिली असल्याचे दिसून येते.मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच कुण्या एका पक्षाच्या हाती जळगावकरांनी सत्ता सोपविली आहे. ही सत्ता सोपविताना शिवसेनेचा जोरदार पराभव झाला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून मनपावर असलेली माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता संपुष्टात आली आहे. हुडकोचे कर्ज, दोन हजार गाळेधारकांचा सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला गाळेकराराचा प्रश्न हे दोन विषय सरकारशी संबंधित आहेत. २०१३ च्या निवडणुकीतही हेच विषय होते. तरीही जळगावकरांनी सुरेशदादा जैन यांच्या आघाडीला निवडून दिले. मात्र हे प्रश्न मार्गी लागले नाहीत. सत्तेशिवाय पर्याय नसल्याने जळगावकरांनी केंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौल देणे पसंत केलेले दिसून येते.यानिवडणुकीतराष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व सपाला भोपळाही फोडता आलेला नाही. एमआयएमने मात्र चमत्कार घडविला आहे. यापक्षाने एकूण सहा जागा लढविल्या, त्यापैकी ३ जागांवर यश मिळविले. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी जळगावात सभा घेतली. मुस्लीम बांधवांच्या विकासासाठी उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला आहे. एकूणच जळगावकरांनी विकासाला कौल दिलेला दिसून येतो.
Jalgaon Election Results : जळगावकरांचा विकासाला कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 8:33 PM
मनपाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच जळगावात कमळ बहरले
ठळक मुद्देकेंद्रात व राज्यात सत्ता असलेल्या भाजपाला कौलजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक