ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.26- मनपा प्रशासनाला बदल्यांचे सत्र सुरू केल्यानंतर अभियंत्यांच्या बदल्या करण्यास अखेर महिनाभरानंतर मुहूर्त सापडला. मात्र तीन वर्ष पूर्ण न झालेल्या तसेच कोणतीही तक्रार नसलेल्या अभियंत्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान नगररचना विभागात बदली झालेल्या तिघा अभियंत्यांनी गुरूवारी उपायुक्तांची भेट घेत नगररचनात बदली न करण्याची विनंती केली.
आयुक्तांनी एकाच विभागात तीन वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी, अधिका:यांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च अखेर अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात या बदल्या करण्यात येणार होत्या. त्यानुसार सर्वात आधी लिपिक व शिपायांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्यानंतर दहा-बारा दिवसांनी आरोग्य विभागातील कर्मचा:यांच्या बदल्या करण्यात आल्या. उपायुक्तांनी नगररचना विभागातील अभियंत्यांच्या बदलीसाठी आदेशही तयार केले होते. त्यानंतर आयुक्तांनी नगररचना विभागात कामासाठी प्रामाणिक अभियंत्यांची नावे सुचविण्याची सूचना केल्याचा लाभ उठवित बुधवारी त्या अंतिम झालेल्या यादीत अचानक फेरबदल करण्यात आला. त्यात नगररचनात 3 वर्ष पूर्ण न झालेल्या तसेच कोणतीही तक्रार नसलेल्या अभियंत्याची बदली करण्यासोबतच इतर विभागात जेमतेम सहा महिने झालेल्या अभियंत्याची नगररचनात बदली करण्याचादेखील निर्णय झाला.