- कुंदन पाटील जळगाव - वाळूसह गौण खनिजाचा अवैधपणे उपसा केल्याप्रकरणी झालेल्या कारवाईनंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापोटी ३ कोटी ९ लाखांवर दंड आकारला असताना जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील प्रशासनाला दमडीही वसुल करण्यात यश मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. पारोळ्यात मात्र ३ लाख ७७ हजार ९७९ रुपयांचा दंड आकारला असताना या रकमेची १०० टक्के वसुली करण्यात आली आहे.
दि.१ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान केलेल्या कारवाईच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. जळगाव तालुक्यात सर्वाधिक कारवाया झाल्या आहेत. ६४ कारवायांच्या माध्यमातून १ कोटी १ लाख १० हजार ७१० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापोटी २० लाख ३९ हजारांची वसुली करण्यात आली आहे.
तीन तालुक्यांचा कागदी ‘खेळ’जामनेरमध्ये ५ कारवायांच्या माध्यमातून १२ लाख २ हजार ६९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या दंडापोटी रुपयाही वसुल करण्यात आलेला नाही. तर बोदवडमध्ये १२ कारवायातून २ लाख ५३ हजार तर मुक्ताईनगरमध्ये एका कारवाईतून १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र या दोन्ही तालुक्यात दंडाची रक्कम वसुली करण्यात आलेली नाही.
१५४ वाहने जमाया ४ महिन्यांच्या कालावधीत १५४ वाहने शासकीय कार्यालयात जमा करण्यात आलेले आहेत. त्यात जळगाव तहसीलदार कार्यालयाने ५३ वाहने जमा केली आहेत. दंडाची रक्कम भरल्यानंतरच ही वाहने सोडण्याची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.