विजय पाटील /चाळीसगाव (जि. जळगाव) - गाव आणि परिसराच्या विकासासाठी शासनावर अवलंबून न राहता गावक-यांनीच पुढाकार घेऊन जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता दुरुस्त केला. उंबरखेड- दडापिंप्री (ता. चाळीसगाव) येथील शेतक-यांनी वर्गणी करुन लालफितीच्या कारभारावर मात केली आहे. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड हे आठ हजार लोकसंख्येचे गाव. या गावापासून दडपिंप्री हे जवळचे गाव. पण दोन्ही गावे जवळ असूनही रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची दुरवस्था. अनेक वेळा अर्जफाटे करुन शासकीय यंत्रणा हालचाल करण्यास तयार नव्हती. शेवटी परिसरातील शेतक-यांनाच यासाठी वर्गणी करण्याची वेळ आली.
उंबरखेड-दडपिंप्री रस्त्यावर ब-याच वर्षापासून खडी टाकून ठेवण्यात आली होती. मोठमोठे खड्डे पडलेले. उंबरखेड गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, हायस्कूल, कॉलेज, बँक शाखा आहेत. गावापासून जवळच असलेल्या दडापिंप्री, चिंचखेडे इथल्या लोकांचा उंबरखेडशी संबंध येतो.दडापिंप्री आणि चिंचखेडे येथे रात्री कुणी आजारी पडले तर त्याला आरोग्य केंद्रापर्यंत आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. शिवाय कॉलेज, हायस्कूलमध्ये जाणा-या विद्याथ्याचे तर हाल होत होते. सायकल सोडाच साधे पायीदेखील या रस्त्यावरून चालता येत नव्हते. तसेच या रस्त्याला अनेक शेतशिवार, रस्ते जोडले जोडण्यात आले आहेत. या रस्त्यावरून शेतमाल घेऊन जाणे हे एक कठीण काम झाले होते.
आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. उंबरखेड-दडपिंप्री-चिंचखेडे येथील शेतक-यांनी ऊसाची लागगड केली आहे. रस्त्याची स्थिती बिकट असल्याने ऊसाची वाहतूक करता येत नव्हती आणि वाहनचालकही शेतापर्यंत वाहन आणण्यास तयार नव्हते.लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाला कळवून देखील दुर्लक्ष केले जात होते. यावर शेतक-यांनीच उपाय शोधून काढला. चिंचखेडे, दडपिंप्री येथील काही शेतक-यांनी जेसीबी लावून स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला. याकामी शेतकरी विजय ठाणसिंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओंकार पवार, अशोक जाधव, सुदाम राठोड, विकास राठोड, संजय राठोड, कैलास पाटील, संजय पवार, धनराज पाटील या शेतकºयांनी पुढाकार घेतला.
रस्त्याची स्थिती खराब असल्याने कुणीही वाहनधारक या रस्त्याने येण्यास तयार होईना, परिणामी दडापिंप्री येथील अनेक शेतकºयांचा माल शेतातच पडून होता. शासनाची वाट किती दिवस पहायची. त्यामुळे आम्ही शेतकºयांनी वर्गणी केली. मुरुम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजले आणि रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपेही काढली. आता रस्ता वाहने येण्या-जाण्या योग्य झाला आहे. याचा आम्हाला आणि गावालाही फायदा झाला आहे. - विजय ठाणसिंग पाटील, आडगाव ता. चाळीसगाव.