विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: गेल्या अकरा दिवसापासून सार्वजनिक मंडळांसह घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवारी सकाळी १० वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणरायाचा जयघोष करीत मेहरुन तलाव परिसरात घरगुती तसेच खासगी मंडळांच्या विसर्जनाला दुपारपासूनच सुरुवात झाली मानाच्या महानगरपालिकेच्या गणपतीचे संध्याकाळी साडे सहा वाजता विसर्जन करण्यात आले.
गणरायाला निरोप देण्यासाठी सोमवारी रात्री शिवतीर्थ मैदानापासून विसर्जन रांगेला सुरुवात करण्यात आली. सर्वात पुढे मानाचा महानगरपालिकेचा गणपती व त्यामागे सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्ती होत्या. मंगळवारी सकाळी १० वाजता ढोल ताशांचा गजर, पुष्प पाकळ्यांची उधळण, बाप्पाचा जयघोष अशा उत्साही वातावरणात व मान्यवरांच्याहस्ते मानाच्या गणपतीचे पूजन करून व महाआरती करून सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. विसर्जन मिरवणुकीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांना सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला असून प्रत्येक मंडळ कलागुणांचे सादरीकरण केले. त्यात एका मंडळाने 'बेटी बचाव'चा सामाजिक संदेश दिला.
दुसरीकडे शहरातील विविध भागातील खासगी मंडळांसह घरगुती गणपती मेहरुन तलाव या विसर्जन स्थळी येण्यास दुपारपासूनच सुरुवात झाली. या ठिकाणी बाप्पाची विसर्जनाची आरती करून निरोप देण्यात आला. संध्याकाळी साडेसहा वाजता मानाच्या महापालिकेच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालणार असून त्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक आटोपण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.