- अमित महाबळजळगाव- राज्यात महायुती भक्कम झाली असून, उद्धव ठाकरे गटाने एक तरी जागा निवडून आणून दाखवावी, असे आव्हान ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ते रविवारी, महायुतीच्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, भाजपा व शिवसेना नैसर्गिक युती असून, राष्ट्रवादी सोबत आल्याने राज्यातील विकासकामांना वेग आला आहे. महायुती भक्कम झाली आहे. मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे हे आपले एकच लक्ष्य आहे. लोकसभेसाठी ४०५ चा नारा दिला आहे. उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्रातून एक तरी जागा निवडून आणून दाखवावी. सकाळपासून काहीही बोलले तरी ते लोकांना आवडत नाही. महायुती म्हणून पुढील काळात अधिक सतर्क राहावे लागणार आहे. नेते, कार्यकर्त्यांच्या अडचणी, व्यथा प्रत्येक मतदारसंघात कमी-जास्त प्रमाणात आहेत. एकत्र लढलो तर समोर कुणीच दिसणार नाही, असेही महाजन म्हणाले.
खडसेंवर टीका...मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. दूध संघात मोठमोठ्या डरकाळ्या फोडल्या; पण घरातले कुणीही निवडून येऊ शकले नाही. पक्षापासून वेगळे झाले, आता त्यांना कुणी विचारत नाही. पक्षापेक्षा मोठा कोणी नाही. सत्ता, पद भोगून जे बोलतात त्याचे मूल्यमापन जनताच करील, असेही गिरीश महाजन म्हणाले.