जळगाव : पर्यावरण व जलसंवर्धनासाठी महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या जळगावच्या कन्या प्रज्ञा अंबादास ठाकूर यांना नुकतेच युनेस्को इंडिया व जलशक्ती मंत्रालय यांच्या वतीने ‘वॉटर डायजेस्ट वॉटर अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जळगावच्या शिरपेचात एकदा पुन्हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रज्ञा ठाकूर यांचे जळगाव शहरातील माहेर आहे. हल्ली त्या पुण्यात राहतात. विवेकांनद प्रतिष्ठानचे संस्थापक रघुनाथ रारावीकर यांच्या त्या कन्या आहेत. ठाकूर ह्या गेल्या २५ वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत आहेत. शाश्वत इको सोल्यूशन फाउण्डेशननामक त्यांची संस्थाही आहे. त्या माध्यमातून पाणी वाचवा, स्वच्छता तसेच कचरा व्यवस्थापन आदी प्रकल्प राबविले. या प्रकल्पांमध्ये सुमारे दहा हजार महिलांनी सहभाग नोंदविला.
ट्रॉफी देऊन सन्मान
दरवर्षी युनेस्को इंडिया व जलशक्ती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांतील व्यक्तींना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित केले जाते. मागील वर्षीचा सन्मान सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उशिरा झाला. महिलांच्या पाणी विषयातील सहभाग या कॅटेगिरीमध्ये नुकतेच प्रज्ञा ठाकूर यांना ‘वॉटर डायजेस्ट वॉटर अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन्मान सोहळा ऑनलाइन पार पडला आहे. ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप होते. गेल्या २५ वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत आहे. नुकताच युनेस्को इंडिया व जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मानित करण्यात आले आहे. याचा आनंद आहे. महिलांचा पाणी विषयातील सहभाग या कॅटेगिरीत हा पुरस्कार मिळाला आहे.
- प्रज्ञा ठाकूर