- विजयकुमार सैतवालजळगाव - पाच दिवसांपूर्वी उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात तीन दिवसांमध्ये दोन हजार २०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे शनिवार, २५ मे रोजी सोने ७२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. चांदी मात्र ९३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
गेल्या आठवड्यात चांदीसोबतच सोन्याचेही भाव वाढत गेले. त्यामुळे २० मे रोजी सोने ७५ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यात ८०० रुपयांची घसरण झाली. मात्र २२ रोजी पुन्हा १०० रुपयांच्या वाढीने ते ७४ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. २३ मे रोजी त्यात एक हजार १०० रुपयांची घसरण झाली. शुक्रवार, २४ मे रोजीदेखील ही घसरण कायम राहत पुन्हा ९०० रुपयांची घसरण होऊन सोने ७२ हजार ४०० रुपये झाले. शनिवार, २५ मे रोजी पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ७२ हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर आले. शेअर बाजार उसळी घेत असल्याने तिकडे गुंतवणूक वाढत असल्याने सोन्याचे भाव कमी होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. चार दिवसांपासून चांदी मात्र ९३ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.