जळगाव : दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या सोने-चांदी बाजार लॉकडाऊन, निर्बंध, जनता कर्फ्यू, ब्रेक द चेन अशा वेगवेगळ्या नावाखाली वर्षभरात सहा वेळा बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ऐन खरेदीच्या हंगामात व्यवसाय ठप्प होत असल्याने करोडो रुपयांची उलाढाल थांबून सुवर्ण व्यावसायिक तसेच हस्त कारागिरांवरही परिणाम होत आहे.कोरोनामुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाले. नंतर हे लॉकडाऊन वाढत जाऊन ४ मे २०२० पर्यंत सुवर्ण पेढ्या बंदच राहिल्या. ५ मे २०२० रोजी सुवर्ण बाजार सुरू झाला, मात्र जळगावात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सुवर्ण व्यवसायिकांनी स्वतः पुढाकार घेत ८ मे २०२० पासून पेठा बंद ठेवल्या. त्यानंतर थेट ४ जूनला दुकाने सुरू झाली. महिनाभर सुवर्ण बाजार सुरू राहत नाही तोच पुन्हा जिल्हा प्रशासनाच्यावतीने ७ ते १३ जुलै दरम्यान, लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. १४ जुलैला सुवर्ण बाजार सुरू झाला. सणासुदीच्या दिवसातदेखील मोठ्या प्रमाणात उलाढालदेखील झाली. मात्र नवीन वर्षात मार्चपासून पुन्हा सुवर्ण बाजाराला झळा सोसाव्या लागत आहे. यात १२ मार्च ते १४ मार्च दरम्यान, जळगावात तीन दिवस जनता कर्फ्यू, २८ मार्च ३० मार्चदरम्यान कडक निर्बंध आणि त्यानंतर आता ६ एप्रिलपासून ब्रेक द चेन जाहीर झाल्याने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद राहणार आहे.कोट्यवधींचा फटकावर्षभरातील सहा वेळा बंद राहण्याचा विचार केला असता सुवर्ण बाजाराला चार ते पाच हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. जळगावातील सुवर्ण बाजाराच्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस सुवर्ण बाजार बंद राहत आहे. यामुळे विवाहासाठीची अनेकांची सोने-चांदी खरेदी लांबणीवर पडली असून करोडो रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. - स्वरूप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन
जळगावचा सोने बाजार वर्षभरात सहा वेळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 3:06 AM