- विजयकुमार सैतवालजळगाव - जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाने मोहीम हाती घेतली असून दोन दिवसात ९२ जणांना अटक करीत सात लाख ५२ हजार २५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार व पोलिस अधीक्षक एम. राजकुमार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी हातभट्टी दारु विरोधात धडक कार्यवाहीची मोहीम राबविण्यात येत आहे. यात १७ व १८ ऑगस्ट या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४० गुन्हे नोंदविले. तसेच १८ ऑगस्ट रोजी पोलिस विभागासोबत संयुक्त मोहीम राबविण्यात येऊन त्यात १०५ गुन्हे नोंदविले आहेत. यात पोलिस विभागाचे सर्व पोलिस स्टेशन व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी सहभाग घेऊन कारवाईमध्ये ९२ जणांना अटक केली. इतर १३ जणांचा गावातील तलाठी व पोलिस पाटील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे.
या कारवाईमध्ये एक हजार ३२४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. तसेच गावठी दारू बनविण्यासाठी वापरले जाणारे १८ हजार ६७३ लिटर रसायन नष्ट करण्यात आले. कारवाईमध्ये सात लाख ५२ हजार २५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमध्ये ६६ लाखापेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात हातभट्टी दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात पहिलीच एमपीइडीची कारवाई यशस्वी करण्यात आली असून सदर इसमास अमरावती येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.