- अमित महाबळजळगाव - २००१ पासून शिवसैनिक म्हणून काम करत आहे. इतकी वर्षे शिवसेना व भाजपा युती होती पण एकाही शिवसैनिकाने भाजपाशी गद्दारी केली नाही. मात्र, भाजपचा उमेदवार माझ्या विरोधात उभा राहिला. त्याला पक्षाकडून बक्षीस मिळाले, अशी खंत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी रविवारी, महायुतीच्या पहिल्याच जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केली.
जळगाव शहरातील शिरसोली रस्त्यावरील एका लॉनवर हा मेळावा झाला. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला जावा म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील म्हणाले, की फडणवीस, शिंदे व अजित पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्येही समन्वय असायला हवा. नेत्यांना बोलावूनही ते बाजार समितीच्या मेळाव्याला आले नाहीत. आमचे काही चुकत असेल तर आम्हाला पायातल्या जोड्याने हाणा पण आमच्यात चाललेले वादळ जर कुणाच्याच लक्षात येत नसेल तर हे चुकीचे आहे. ‘मी आता जे काही बोललो ते मला माहीत नाही.’ पण तिळगूळ घ्या, गोडगोड बोला... लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुती म्हणून बहुमत मिळवूया, असेही आमदार किशोर पाटील शेवटी म्हणाले.
खालीही समन्वय हवा...शिवसेना, भाजपा युती म्हणून लढलो. निवडणुकीनंतर विरोधात उभे राहिलो. लढलो सोबत पण सत्ता स्थापन केली विरोधकांसोबत. आज पुन्हा सोबत आलो आहोत. आम्ही जे केले ते ती गद्दारी नाही, तर उठाव होता. वर नेत्यांमध्ये समन्वय असेल तर खालीही तो हवा, असेही आमदार किशोर पाटील म्हणाले.