जळगाव,दि.26-कानळदा रस्त्यावरील आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगमध्ये असलेल्या कापसाच्या गंजीला बुधवारी दुपारी एक वाजता अचानक आग लागली. या आगीत एक हजाराच्यावर क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. या आगीत एक कोटी रुपयांच्यावर नुकसान झाल्याचा दावा जिनिंग व्यवस्थापनाने केला आहे. दरम्यान, तीन अगिAशमन बंब व कामगारांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. दरम्यान, ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट होवू शकले नाही.
शहरापासून जवळच असलेल्या आव्हाणे शिवारात लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांच्या मालकीची लक्ष्मी जिनिंग आहे. ही जिनिंग सध्या त्यांचे बंधू साहेबराव गंगाराम पाटील मालक असलेल्या राजेश ट्रेडींग कंपनीला भाडय़ाने दिलेली आहे. या ट्रेडींग कंपनीचा 3 हजार क्विंटल कापूस जिनिंगच्या आवारात होता. ट्रॅक्टरच्या सहाय्याने हा कच्चा कापूस जिनिंगमध्ये प्रक्रिया करण्यासाठी वाहतूक केली जात असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास एका गंजीतून धूर निघत असल्याचे ट्रॅक्टर चालक उज्जवल सोनवणे यांच्या लक्षात आले होते.