- अमित महाबळ जळगाव - क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणेमार्फत राज्यस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन दि. २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान उदगीर (जि. लातूर) या ठिकाणी करण्यात आले होते. महाराष्ट्रातील आठ महसूल विभागांतून कान्ह ललित कला केंद्र, जळगावच्या वैभव मावळे लिखित एकांकिका ‘कंदील’ने आठ विभागांतून प्रथम पारितोषिक पटकावले. या एकांकिकेची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे म्हणजेच युवादिनाचे औचित्य साधत नाशिकला साजऱ्या होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात २७ राज्यांचा सहभाग राहणार असून, नाशिक विभागातून कान्ह ललित कला केंद्राची निवड झालेली ‘कंदील’ ही एकांकिका महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
कान्ह ललित कला केंद्राचे संचालक प्रा. प्रसाद देसाई यांच्या नेतृत्वात संघाने यश मिळवलेले आहे. विद्यार्थ्यांना प्रा. पीयीष बडगुजर, दिनेश माळी, प्रा. अजय शिंदे, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. वैभव मावळे, प्रसाद कासार आणि प्रा. हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे.
विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सांस्कृतिक समन्वयक व प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्रा. डॉ. एस. एन. भारंबे, नाशिक क्रीडा विभाग उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव रवींद्र नाईक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
युवक महोत्सवात नाशिक विभागाला बक्षिसेएकांकिका : प्रथम, कुणाल जाधव (फोटोग्राफी द्वितीय), शुभम जाधव (कथालेखन द्वितीय), सागर साठे (फोटोग्राफी तृतीय), सलोनी जैन (वक्तृत्व तृतीय), जान्हवी महाजन (पाककला तृतीय), गायत्री कुमावत (प्रदर्शन कला तृतीय), आनंद हिवरे (ॲग्रो प्रथम).