लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात मंगळवारी विविध शेतकरी व राजकीय संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदला समर्थन म्हणून मंगळवारी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यवहार ठप्प होते. यामुळे बाजार समितीचे तब्बल तीन कोटींची उलाढाल मंगळवारी ठप्प राहिली, तर जळगाव तालुक्यातील आव्हाणे परिसरातील तिन्ही व जळगाव शहरातील दोन अशा पाचही सीसीआयच्या जिनिंग बंद ठेवण्यात आल्या. यामुळे हा बंद जरी शेतकरी हितासाठी पुकारण्यात आला असला तरी याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसल्याचे चित्र पहायला मिळाले.
कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने सोमवारीच भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे जाहीर केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल घेऊन भाजीपाला मार्केटमध्ये आले होते. मात्र, लिलावच न झाल्याने शेतकरी आपला माल घेऊन परत फिरले. हीच स्थिती धान्य मार्केटमध्येदेखील पहायला मिळाली. याठिकाणीही अनेक शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेऊन आले. नंतर त्यांनाही आपला माल घरी घेऊन जावा लागला. सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, बाजार समिती बंद असल्याने कांद्याची तब्बल ५० ते ७०० लाखांपर्यंतची उलाढाल ‘भारत बंद’मुळे ठप्प राहिली अशी माहिती बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांनी दिली.
सीसीआयचीही खरेदी बंद
कापसाची खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जळगाव तालुक्यातील आव्हाणे व जळगाव शहरातील मिळून पाच केंद्रांवरील कापूस खरेदीदेखील मंगळवारी बंद ठेवण्यात आली. यामुळे आपला माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना मालासकट केंद्राबाहेर एक दिवस थांबावे लागणार आहे. दरम्यान, सीसीआय प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी माल खरेदी करण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, जिनर्सने माल खरेदी न करण्याची भूूमिका घेतल्याने ही केंद्र बंद ठेवण्यात आली.
शासकीय खरेदी केंद्र सुरू
भारत बंदमुळे बाजार समिती जरी बंद असली तरी मार्केटिंग फेडरेशनकडून सुरू असलेली मक्याची खरेदी सुरू होती. तसेच भरड धान्य खरेदीदेखील सुरु होती. यासह अनेक खासगी व्यापाऱ्यांनी भारत बंद असतानाही धान्य खरेदी सुरू ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल याठिकाणी विक्री केला. दरम्यान, भाजीपाला मार्केटचे लिलाव न झाल्याने भाजीपाला आणलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपला माल जळगाव शहरातील विविध भागांत जाऊन विक्री केल्याचे दिसून आले. तसेच मार्केटबाहेरच अनेक शेतकऱ्यांनी माल विक्री केल्याचे आढळून आले.