आॅनलाईन लोकमत,
जळगाव-दि.६,शहरातील शिवाजी नगरातील रस्त्यांची प्रचंड दैना झाली असल्याने याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील दखल घेतली जात नसल्याने येथील भुरे मामलेदार प्लॉट परिसरातील रहिवाश्यांनीच स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजविले.
भुरे मामलेदार प्लॉट परिसरातील रस्त्यावर मोठ-मोठ खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे काही वाहनधारकांचा अपघातही झाला. मात्र मनपाकडून या रस्त्याची साधी डागडूजी देखील करण्यात न आल्याने येथील काही रहिवाश्यांनी स्व:खर्चानेच रस्त्यावरील खड्डे बुजविले.
इन्फो-हातगाडीवरून आणला मुरुम१. भुरे मामलेदार प्लॉट परिसरात मध्यमवर्गीय नागरिकांचा मोठा रहिवास आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा खर्च नागरिकांना न परवडणारा आहे. त्यामुळे सतीश सनस, सुनील चोरट, विकास पाटील, सोनू पाटील यांनी सलग दोन दिवस हातगाडीवरुन मुरुम आणला व परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविले.
२. भुरे मामलेदार प्लॉट परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविले असले तरी शिवाजी नगरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाली आहे. पाऊस झाल्यावर या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. त्यामुळे निदान रस्त्याची डागडुजी तरी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.