- अमित महाबळ
जळगाव : राज्याच्या अर्थसंकल्पात जळगाव शहर आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या कामांसाठी ८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून सिमेंट काँक्रीटचे रस्ते केले जाणार आहेत. टॉवर चौक ते डीएसपी चौक यासह इतरही प्रमुख रस्त्यांचा यामध्ये समावेश आहे. यातील दोन रस्त्यांची कामे प्राधान्यक्रमाने केली जाणार आहेत, अशी माहिती आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी, पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात भाजपा व शिंदे गटाची सत्ता आल्यापासून ४० कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे. फक्त निधी आणत नाही तर त्यातून विकासकामे जलदगतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उगाच मोठी स्वप्ने दाखविण्यापेक्षा कामे करण्यावर भर आहे. चांगले रस्ते व पाणी देऊ, असेही आमदार भोळे यांनी सांगितले.
हे होणार फायदे
- बजेटमधील निधीतून २२.३५ किमी रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. यापैकी जुना जकात नाका ते देवकर कॉलेज रस्ता काँक्रीटचा होत असून, यामध्ये कमी पडत असलेल्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- पाचोरा रस्ता ते औरंगाबाद रस्ता हा बाह्यमार्ग असून, पाचोराकडून येणारी आणि औरंगाबादला जाणारी अवजड वाहतूक शहराच्या बाहेरून निघून जातील. यामुळे शहरातील वाहतूकीचा ताण कमी होईल.
- मोहाडी रस्ता आणि महाबळ कॉलनीला जोडणाऱ्या दोन रस्त्यांचे काम एक महिन्यात सुरू होत आहे.
२२.३५ कि.मी लांबीचे रस्ते
रस्ते - लांबी - रक्कम
- अजिंठा चौफुली ते नेरी नाका - १ किमी - ३.५ कोटी
- जुना जकात नाका ते देवकर कॉलेज - १.१ किमी - ३.५ कोटी
- पाचोरा रस्ता ते औरंगाबाद रस्ता बाह्यमार्ग - ३ किमी - १० कोटी
- निमखेडी जुना हायवे ते सुरत रेल्वे गेट आणि शिवाजीनगर उड्डाण पूल ते टॉवर चौकमार्गे असोदा रेल्वे गेटपर्यंत - ६ किमी - २१ कोटी
- टॉवर चौक ते डीएसपी चौक - ३.२५ किमी - २५ कोटी
- नुक्कड कॉर्नर ते मोहाडी रस्ता - ३ किमी - ५ कोटी
- पिंप्राळा पीरबाबा दर्गा ते सावखेडा - ३ किमी - १० कोटी
- वाघनगर ते गिरणा पंपिंग रोड - २ किमी - ७ कोटी