खूबचंद साहित्या टॉवर: स्वखर्चाने पाईपलाईन टाकण्याची मागितली परवानगी
जळगाव, दि.29- खूबचंद साहित्या टॉवरमधील नागरिकांना गेल्या तीन वर्षापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून या नागरिकांनी दौलतनगर पाण्याच्या टाकीपासून स्वखर्चाने पाईपलाईन टाकण्याची तयारी दर्शविली आहे. ही पाईपलाईन टाकण्याची परवानगी मिळण्याच्या मागणीसाठी या नागरिकांनी बुधवारी थेट मनपा गाठत पाणीपुरवठा अभियंत्यांना निवेदन दिले.
दौलतनगर पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईन टाकण्याच्या कामास परवानगी मिळावी, या मागणीसाठी हे नागरिक मनपात आले होते. त्यात महिलांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश होता.
200 कुटुंबांचा प्रश्न
खुबचंद साहित्या टॉवर परिसरात मनपाची पाणीपुरवठा पाईपलाईन नसल्याने या परिसरातील सुमारे 200 कुटुंबांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी 400 रूपये मोजून पाण्याचा टँकर मागविला जातो. मनपातर्फे टँकरमार्फतही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे या नागरिकांनी स्वखर्चाने दौलतनगर पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईन टाकून घेण्याची तयारी दर्शविली आहे.