पारोळा (जि. जळगाव) - अवैधरित्या गॅस भरतांना तीन ते चार सिलेंडर्सचा स्फोट होऊन आग लागली. या आगीत दोन कार जळून खाक झाल्या. ही भीषण घटना पारोळ्यानजीक म्हसवे शिवारात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. एकापाठोपाठ चार सिलेंडर्सचा स्फोट झाल्याने म्हसवे गावकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आणि पळापळ सुरु झाली. सुदैवाने यात कुठलीही जिवित हानी झाली नाही.
पारोळा शहरापासूनजवळच असलेल्या म्हसवे शिवारात एका ढाब्यामागे दोन वाहने गॅस भरण्यासाठी आली होती. यात एका वाहनात गॅस भरला जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि शेजारीच ठेवण्यात आलेले यात तीन ते चार सिलेंडर्स फुटले. यामुळे आग लागून तिथे उभ्या असलेल्या दोन कार जळून खाक झाल्या. एकापाठोपाठ चार ते पाच वेळा सिलेंडर्सचा आवाज झाला आणि आग लागल्याने म्हसवे गावातील लोक भयभीत झाले होते.
काही वेळानंतर आवाज बंद झाल्याने पारोळा येथील अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी चारचाकी वाहनाला लागलेली आग आटोक्यात आणली. घटनास्थळी २० ते २५ सिलेंडर्स आढळून आले. यातील तीन ते चार सिलेंडर्सचा स्फोट झाला. सुदैवाने परिसरात कुठलीही जीवित हानी झाली नाही.