- शाम जाधवजळगाव - मुख्य बाजार पेठेतील राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री दोन ते अडीच दरम्यान आग लागली.आगीत गौरव राखेचा (२७) या तरुणाचा जळाल्याने करुण अंत झाला.
तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या मेनरोड वरील राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस मध्यरात्री अचानक आग लागली. आग इतकी भयंकर होती की,आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केले.आगीच्या ज्वाला दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून खिडकीच्या बाहेर येत होते,आगीची माहिती मिळताच पोलीस,नगर पालिका प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी चोपडा, अमळनेर, धरणगाव, यावल, शिरपूर, जळगांव येथील अग्निशमन दलाची वाहने दाखल झाली होती.
नगर पालिकेचे फायर विभागाचे कर्मचारी व शहरातील तरुण यांनी आग विझवण्यासाठी अथक परिश्रम केले.यात घरात अडकलेल्या पाच वर्षीय चिमुकलीसह सहा जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र गौरव हा जीव वाचवण्यासाठी इतरत्र जागा शोधण्याच्या नादात बेडरूम मधून बाथरूम मध्ये थांबला. तिथेच त्याचा घात झाला.सकाळी सहा वाजता बाथरूममध्ये जळालेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला.
बेडरूम मधेच राहिला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. या आगीत इमारतीचे दोनही मजले जळून खाक झाले आहेत.आग इतकी तीव्र होती की घरातील पीओपी,घरातील, जिन्यातील फरशा, किचन ओटा, भांडी जळून कोळसा झाले आहेत.
सोफ्याच्या ड्रावरमध्ये ठेवलेली नोटांची बंडल जळाली. रात्री दोन ते अडीचच्या सुमारास लागलेल्या आगीवर सहा वाजता नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र गौरव याला वाचवण्यात अपयश आल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे,आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.