आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.७ - माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखालील खान्देश विकास आघाडीचे उमेदवार व मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपासह राष्टÑवादी कॉँग्रेस, शिवसेना, जनक्रांती यांनी कोल्हे यांना पाठिंबा दिल्याने ४ सप्टेंबर रोजीच त्यांची बिनविरोध निवड झाली होती. गुरुवारी अधिकृत घोषणा झाली. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतशबाजी करीत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी ७, शिवाजीनगर येथे भेट देऊन सुरेशदादा यांचे आशीर्वाद घेतले. महापौर निवडीसाठी महापालिकेच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वाजता नगरसेवकांची विशेष बैठक झाली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे होते. त्यांच्यासोबत व्यासपीठावर नगरसचिव अनिल वानखेडे हे होते. नियमानुसार निवड प्रक्रिया सुरू होताच प्रथम दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. यात ललित विजय कोल्हे यांचे तीन अर्ज वैध असल्याचे पीठासीन अधिकारी निंबाळकर यांनी जाहीर केले. त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. या काळात माघार घेतली न गेल्याने जिल्हाधिकाºयांनी ललित कोल्हे यांची बिनविरोध निवड घोषित केली. ललित कोल्हे यांची बिनविरोध निवड जाहीर होताच सभागृहात सदस्यांनी बाक वाजवून त्यांच्या निवडीचे स्वागत केले. तर बाहेर फटाक्यांची जोरदार आतशबाजी झाली. ढोल-ताशाच्या गजरात कोल्हे यांच्या समर्थकांनी ठेका धरला.