जळगाव - पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार नॉन मिलियन प्लस सिटीज अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत नगरपंचायत, नगरपालिका, ड वर्ग महापालिका क्षेत्रात विविध उपाययोजनांसाठी शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यातील ड वर्गातील १० महानगरपालिका व ४०० नगरपालिकांसाठी १९१ कोटी इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे.
पाणी साठवण व घनकचरा व्यवस्थापनासाठी २८६.५० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. या दोन्ही योजनेतून जळगाव मनपाला ९ कोटी ४३ लाख ३० हजार ८२३ रुपयांचा तर उर्वरित १९ नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींनाही लाखोंचा निधी मिळणार आहे. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीतून मनपा, नपा मालामाल होणार आहे.
जळगावला ९ कोटी
जळगाव महापालिकेला बंधनकार/मुलभूत अनुदानातून ३ कोटी ७५ लाख ८७ हजार २२० व साठवण घनकचरा व्यवस्थापनासाठी ५ कोटी ६७ लाख ४३ हजार ६०३ असे एकूण ९ कोटी ४३ लाख ३० हजार ८२३ रुपयांचे अनुदान मंजूर झालेले आहे. यापाठोपाठ भुसावळ, अमळनेर नगरपरिषदांनाही एक कोटीच्यावर अनुदान मंजूर झालेले आहे. इतर नगरपालिका, व नगरपंचायत क्षेत्रांना देखील १५ लाखाच्यावर अनुदान मिळणार आहे. या अनुदानातून शासनाने निर्देशित केलेली कामे संबंधित उपाय योजनेच्या विनियोगासाठी करणे बंधनकारक आहे.