ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.1 - मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला 25 कोटींचा निधी मनपाच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्यामुळे या निधीतील कामे मनपाच करणार, हे स्पष्ट झाले आहे. 20 जून 2015 मध्ये जळगाव दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासासाठी 25 कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. अखेर हा निधी दोन वर्षानंतर प्राप्त झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
25 कोटींची घोषणा झाल्याने मनपाने प्रस्तावही पाठविला होता. मात्र, बजेटमध्येच तरतूद नसल्याने निधी मिळू शकला नव्हता. त्यामुळे तो प्रस्ताव जुना झाल्याने त्यातील तातडीची कामे मनपाने करून टाकलेली असल्याने दुसरा सुधारित प्रस्ताव पाठविला. मात्र, त्यावर नाराज झालेल्या आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने या 25 कोटींच्या निधीतील कामे ठरविण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून सदस्य म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच आमदार सुरेश भोळे तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी यांचा समावेश आहे.
या समितीने कामांची निवड करावयाची असून कार्यान्वित यंत्रणा म्हणजेच ही कामे कोणामार्फत करावीत (मनपा की सार्वजनिक बांधकाम विभाग) हे निश्चित करावयाचे आहे. त्यामुळे हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होऊनही काम कोण करणार? हे निश्चित झाल्यावर त्या विभागाकडे निधी वर्ग केला जाणार होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत 21 एप्रिल 2017 रोजी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत या निधीतून कोणती कामे करावीत? याबाबत ढोबळ निर्णय झाला होता.