जळगाव- स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षण-2020 मध्ये देशातील 382 शहरांचा समावेश होता. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि कें द्रीय समितीने डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 मध्ये पाहणी केली होती. दरम्यान, याबाबत नुकताच निकाल जाहीर करण्यात आला असून यात जळगाव मनपा देशातून 64 व्या स्थानावर तर राज्यातील 33 मनपातून 20 व्या स्थानावर आहे.स्वच्छ भारच अभियांतर्गत केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात देशातील 1 लाख ते 10 लाख लोकसंख्येतील 382 शहरात जळगाव शहराचा देखील समावेश आहे. या अभियानाची जळगाव मनपात अंमलबजावणी करण्यात येत आहे. मागील वर्षी जळगाव मनपा 76 व्या स्थानी होते. त्यानंतर मनपाने स्वच्छतेच्याबाबत ओला-सुका कचरा वर्गीकरणावर लक्ष केंद्रीत केल्यामुळे यंदा 64 क्रमांकावर स्थान मिळविले आहे.स्वच्छ सर्वेक्षणाबाबत राज्य आणि केंद्रीय समितीने डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 मध्ये पाहणी केली होती. यावेळी समितीने वेगवेगळ्या प्रभागात भेटी देवून पाहणी केली होती. तसेच नागरिकांचा अभिप्राय ,ओला-सुका कचरा वर्गीकरण,प्लास्टीक बंदी, डोअर टू डोअर कचरा संक लन, कागदपत्रांची पूर्तता आणि घनकचरा प्रक्रिया प्रकल्प असे निकष असून समितीने तपासणी केली होती. त्यानुसार मनपाने 64 वे स्थान पटकावले आहे. शहरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प नसल्यामुळे स्थान घसरला असल्याचे निदर्शनास आले आहे.जळगाव शहरातील साफसफाईसाठी मनपाने वॉटरग्रेस कंपनीला एकमुस्त मक्ता दिला आहे. मात्र मक्तेदाराचे काम समाधानकारक नसल्यामुळे जवळपास सहा महिने काम बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने सफाईसाठी पर्यायी व्यवस्था केली होती. त्याच दरम्यान राज्य आणि कें द्रीय समितीच्या पथकाने पाहणी केली होती. या अभियानाचा निकाल जाहीर झाला असून जळगाव मनपा देशातून 64 व्या स्थानावर तर राज्यातील 33 मनपातून 20 व्या स्थानावर आहे. आता पून्हा वॉटरग्रेसला संधी देण्यात आली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा 64 व्या स्थानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:49 AM