जळगाव :भारतीय जनता पार्टीसोबत रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाची (आठवले गट) युती असतानाही या पक्षाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत मनपा निवडणुकीत एकाही जागेवर रिपाइंचा उमेदवार न दिल्याने या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.भाजपा आणि रिपाइं (आठवले गट) यांच्या युतीदरम्यान सत्तेत १० टक्के वाटा देण्याचे सूत्र देखील ठरले आहे. त्याच अनुषंगाने जळगाव मनपा निवडणुकीत रिपाइंने राखीव गटातील ५ व जनरल गटातील ३ अशा ८ जागांवर उमेदवारीची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व आमदार सुरेश भोळे यांच्याकडे केली होती, असे सूत्रांकडून समजते.यासाठी रिपाइं आठवले गटाचे जिल्ह्यातील नेते रमेश मकासरे, महानगर जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांनी शिष्टमंडळासह भेटले होते. याचबरोबर रिपाइंचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन काही जागा रिपाइंसाठी सोडण्याची मागणी केली होती.यावेळी महाजन यांनी होकार दिला होता. नंतर मात्र काहीच प्रतिसाद भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मिळाला नसल्याचे रिपाइंचे म्हणणे आहे.याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर झाला असल्याचे बोलले जात असून महानगर जिल्हाध्यक्ष अनील अडकमोल यांनी तर आपली नाराजीही व्यक्त केली आहे.भाजपाने रिपाइंस काही जागा सोडाव्या अशी मागणी आम्ही केली होती. परंतु आम्हाला एकही जागा न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तरीही आमची युती असल्याने अधिक बोलणे उचित ठरणार नाही.- अनिल अडकमोल, महानगर जिल्हाध्यक्ष, रिपाइं (आठवले गट)
जळगाव महापालिका निवडणूक : भाजपाने दाखवला रिपाइंला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:12 PM
मागणी करुनही दिली नाही एकही जागा
ठळक मुद्देनाराजी१० टक्के वाटा देण्याचे सूत्र देखील ठरले